चोपड्यात बुधगाव तपासणी नाक्यावर अडविला ट्रक
चोपडा (प्रतिनिधी) :- बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यास ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आल्याची धडक कारवाई चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने नुकतीच केली. सदर कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यापुढे बाजार समितीच्या तपासणी नाक्यावर बाजार फी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर अशी दंडात्मक कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करण्यांत येईल असा इशारा बाजार समितीचे सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी दिला आहे. धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील खासगी कापूस व्यापारी भगवान खंडू सुर्यवशी, समाधान पंढरीनाथ पाटील व आप्पा कौतिक पाटील यांनी चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात खेड्यावर कापूस खरेदी करून बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी न भरता कापसाचा भरलेला ट्रक अमळनेर शहराकडे नेला.
त्याचवेळी बुधगाव येथील तपासणी नाक्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सदर ट्रक अडविला. नंतर बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी भरण्याचे सांगितले. यावेळी कापूस व्यापारी भगवान खंडू सुर्यवशी, समाधान पंढरीनाथ पाटील व आप्पा कौतिक पाटील यांनी तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून मार्केट फी भरण्यास नकार दिला. याची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक विजय शालीकराव पाटील हे तपासणी नाक्यावर हजर झाले त्यानंतर बाजार समिती सचिव आर.बी. सोनवणे, उपसचिव जे. एस. देशमुख, एन. आर. सोनवणे, लिपीक राकेश पाटील, योगेश निकम, निकीतेश पाटील, अशोक पवार आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुकटी ता.जि. धुळे येथील खासगी व्यापाऱ्यांचा कापूस भरलेला ट्रक (क्रमांक एम. एच. २० – १३५३) चोपडा बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात आणून संबधित कापूस व्यापाऱ्याकडून ११ हजार रुपये दंड वसुल केल्याची कारवाई केली.