जळगाव जिल्ह्यात पडताळणी करूनच कार्यमुक्ततेची कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या निर्देशांनुसार जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया व्हिन्सेस आयटी या संस्थेमार्फत ठरवून दिलेल्या विहित कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण २ हजार ६६६ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या निश्चित करून त्यांना नवीन शाळांवर पदस्थापना देण्यात आल्या आहेत.
सध्या बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळांवर कार्यमुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, या कार्यवाहीदरम्यान संबंधित शाळा शून्य शिक्षकी होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून, आवश्यक पडताळणी करूनच कार्यमुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाने कळविले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, नियमानुसार आणि सुरळीतरीत्या पार पाडण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.