पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो व वाळू ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौक येथील हायवेवरुन एका वाहनातून चोरटी वाळु गौण खनिज वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना मिळाली होती. पोउनी दळवी यांनी पो. हे. कॉ. राहुल शिंपी व पो. हे. कॉ. भगवान चौधरी यांना कारवाईसाठी रवाना केले. दरम्यान एम. एम. कॉलेज चौक, पाचोरा येथे पोलिस कर्मचारी शासकिय गणवेश परिधान केलेले पाहुन एक तपकिरी रंगाचा ९०९ टेम्पो वरील चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा जारगांव रोडकडे पळवुन घेवुन जात असतांना त्यास भडगांव रोड वरील सिध्दीविनायक हॉस्पीटल येथे थांबविले.
सदर टेम्पोवर संशय आल्याने पोलिसांनी चालकास त्याचे टेम्पोमध्ये काय आहे असे विचारले असता सदर टेम्पो चालक हा उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. पोलिसांनी सदर वाहनात काय आहे हे पाहिले असता सदर वाहनात वाळु हे गौण खनिज असल्याचे दिसुन आले. तेव्हा त्यास सदर गौणखनिज वाहतुकीबाबतचे परवाने आहे अगर कसे या बाबत विचारले असता त्याने त्याचे जवळ कोणत्याच प्रकारचा परवाना नसल्याबाबत सांगीतले. तसेच सदर टेम्पोचे कागदपत्रे नसल्याचे त्याने सांगीतले.
त्यामुळे चालक मोहम्मद जावेद मोहम्मद शफी शेख (वय ४५ वर्षे, रा. यशवंत नगर, भडगांव) यांचेविरुद्ध कारवाई करून ताब्यातील गुन्हयात वापरलेले ४ लाख रुपये किंमतीचे तपकिरी रंगाचे ९०९ टेम्पो क्रमांक एम. एच. डी. – ०४ एफ. ७३६२ व ८ हजार रुपये किंमतीची विना परवानगी वाहतूक करणारी सुमारे दोन ब्रास वाळु गौण खनिज असा ४ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालक मोहम्मद जावेद मोहम्मद शफी शेख याचेविरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात पो. कॉ. योगेश सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.