जळगाव (प्रतिनिधी) – हातपाय धुण्यासाठी गेलेला आव्हाणे येथील तरूण काल रविवारी ४ ऑक्टोबर रोजी गिरणा नदीत बुडाला होता. त्यांचा मृतदेह सोमवार दि. ५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडनगरी येथे आढळला. शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंकज किरण भोई (वय-२४) रा. आव्हाणे ता. जळगाव हा तरूण शेती काम करतो. त्यांचे गिरणा नदीच्या किनाऱ्यावर शेत आहे. शेतात पंकज हा लहान भाऊ राधेश्यामसह आई वडीलांना मदत करतात. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून पंकज आणि लहान भाऊ राधेश्याम हे पायी घराकडे निघाले होते. दोन्ही भाऊ गिरणा नदी पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरले. यात पंकज हा हातपाय धुत असतांना नदीतील वाळूच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून वाहू लागला. हे पाहून लहान भाऊ राधेश्याम याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. रविवारी रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. आज सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळीपासून देखील गिरणा नदीजवळील काही पोहणाऱ्या तरूणांनी शोध येण्यास सुरूवात केली होती. दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडनगरी येथे तरूणाचा मृतदेह गावातील नावाडी याला आढळून आला. अशी माहिती गावातील नागरिक अमोल चौधरी यांनी दिली. याप्रकरणी तालुका पोलीसांना कळविण्यात आले असून मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.