यावल तालुक्यात वन अधिकाऱ्यांची कारवाई
यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यात गोपनीय माहिती मिळाल्यावरून वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल वनविभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून दि. १७ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनविभागाचे पथक दबा धरुन् बसले. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९बीजी ६२१०) मध्ये अवैध् लाकूड भरलेले दिसले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथदर्शनी हा वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार, यावल येथे आणून जमा केला. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रॅक्टरमध्ये अंजन, निम इमारती लाकूड अंदाजे नग १८. घ.मी. व २९ हजार ५०८ रुपयांचे जप्त करण्यात आले आहे.
वन रक्षक हरिपुरा यांनी वाहन चालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली ता. यावल जि. जळगाव यांच्यावर भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कार्यवाही ही जमीर शेख, उपवनसंरक्षक यावल वनविभाग, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. वन व वन्यजीव तसेच लाकूड वाहतूकसंबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.