मुंबईच्या मानपाडा येथील घटना, पतीसह सासूवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील माहेर असलेल्या विवाहितेने मुंबई येथील मानपाडा येथील सासरी छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ५ जुलै रोजी उघड झाली आहे. दरम्यान नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे अखेर कुऱ्हे पानाचे येथील घरी आणून विवाहितेचा अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर मानपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागृती सागर बारी (वय २४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांची ती कन्या आहे. गजानन वराडे यांनी मुलगी जागृतीचा विवाह जळगाव येथील पिंप्राळातील सागर रामलाल बारी (वय ३२) याच्याशी दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी लावून दिला. यानंतर ५ जुलैला ११ वाजता सागरने जागृतीचा भाऊ विशाल वराडे याला फोन केला. तुझी बहीण जागृतीने घरातील बेडरूममधील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सांगून फोन कट केला.
सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून शुक्रवारी मानपाडा येथील घरी जागृतीचे गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलमध्ये माझ्या आत्महत्येला सासू आणि नवरा जबाबदार असल्याची नोट लिहिल्याचे समोर आले. त्या आधारावर मानपाडा पोलिस ठाण्यात (डोंबिवली पूर्व) गुन्हा दाखल झाला. दरम्यान, कुटुंबीयांनी अग्निडाग देण्यास नकार दिल्याने जागृतीचा मृतदेह कु-हे पानाचे येथे आणून ७ जुलैला अंत्यविधी करण्यात आले. भाऊ विशालने अग्निडाग दिला.
मुंबई येथे जागृतीची आई वंदना वराडे यांनी, घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मुलगी जागृतीने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पती सागर बारी, सासू शोभा बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.