जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिलखेडा येथे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार दिनांक ९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. नळाला पाणी आल्याने घरात भांडे घेण्यासाठी मुलगा गेला त्या वेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
दीपक सीताराम भालेराव (३८, रा. पिलखेडा, ता. जळगाव) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक भालेराव व त्यांच्या पत्नीदेखील शेतीकाम करतात. पत्नी रविवारी सकाळी दीराणीसोबत शेतात गेलेल्या होत्या. तसेच त्यांची दोन्ही मुले घरासमोर खेळत होते. त्या वेळी घरात एकटेच असलेल्या दीपक यांनी गळफास घेतला. नळाला पाणी आल्याने त्यांचा मोठा मुलगा धीरज हा पाण्यासाठी घरात भांडे घेण्यासाठी गेला. त्या वेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी व भावांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत दीपक यांना दोन मुले असून मोठा मुलगा धीरज हा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला. तर लहान मुलगा सिद्धार्थ हा इयत्ता नववीला आहे. मयताचे भाऊ व आई-वडीलही गावातच राहतात.