जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील एका तरुणाने नैराश्यातून छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २१ मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
शशिकांत रवींद्र माळी (१९, रा. नशिराबाद, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. नशिराबाद येथे सात बाजार भागात शशिकांत माळी हा आई, वडील व लहान भाऊ व बहीण यांच्यासह राहतो. वडील कंपनीत नोकरीला असून त्यावर परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शशिकांतचे शिक्षण सुरू होते. मंगळवारी दि. २१ मे रोजी कुटुंबातील सदस्य खालच्या खोलीत असताना शशिकांत वरच्या मजल्यावर गेला. तेथे त्याने छताला गळफास लावून घेतला. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा लहान भाऊ त्याला बोलवायला गेला, तेव्हा हि घटना उघड झाली.
त्याने कुटुंबियांना व शेजारील मंडळींना बोलवले आणि शशिकांतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या वेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.