जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी येथे एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९, रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरुण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते मेहरूणमध्ये पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होते. एमआयडीसी येथील बँजो केमिकल कंपनीत कामगार म्हणून काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी मेहरूण तलाव येथे जाऊन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. विलास वाणी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगडं यांनी तपासून मयत घोषित केले.
कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्युची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.