चोपडा तालुक्यातील हातेड येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी येथील टपाल सेवेतील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सदर तरुण हा मागील काही दिवसांपासून नैराश्येत होता. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
तालुक्यातील साकळी येथील हनुमानपेठ भागातील रहिवासी असलेला निखिल रवींद्र परिस्कर (कुंभार, वय ३२) हा काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या टपाल विभागात नोकरीला होता. दरम्यान तीन ते चार वर्षांपूर्वी त्याला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर बढती मिळाली होती. किनगाव ते चोपडा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हिजिट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत होते. दोन दिवसांपूर्वी तो नेहमीप्रमाणे कामावर निघाल्यानंतर सायंकाळी चोपडा तालुक्यातील काही टपाल कार्यालयांना भेटी देण्याच्या कामानिमित्ताने चोपड्याकडे गेला होता. परंतु सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान निखिलने चोपडा- हातेड रस्त्यावरील पुलाखाली दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या घटनेच्या अगोदर नैराश्यातून निखिलने काही मित्रांना फोनवर लोकेशन टाकून व फोन करून ‘मी आत्महत्या करीत आहे, आता मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही” असे सांगितले. मित्रांनी तत्काळ शोधाशोध केली. मात्र निखिलचा फोन स्वीच ऑफ असल्याने शोध घेण्यात अपयश आले. त्याची मोटारसायकल घटनास्थळी पुलाच्या वर लावलेली होती. दरम्यान, काही दिवसांपासून निखिल हा मानसिक तणावात होता.