चोपडा तालुक्यातील घुमावल येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील घुमावल येथील भाजयुमोचे तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच प्रकाश लक्ष्मण पाटील (४४) यांनी शनिवारी दि. २० जुलै रोजी सकाळी त्यांच्या मालकीच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश लक्ष्मण पाटील (४४, रा. घुमावल ता. चोपडा) यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी ४ ते ४:३० वाजेदरम्यान त्यांच्या मोबाइलमध्ये सर्वांना त्यांनी ‘जय श्रीराम’चा मेसेज पाठवला आहे.(केसीएन)दि. २० रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या दुचाकीवरून त्यांनी मारुती मंदिर परिसरात असलेल्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. गळफास घेण्याआधी त्यांनी नेहमीप्रमाणे मारुती मंदिरातील देवाचा फोटो मोबाइलमध्ये काढून तोही त्यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवला होता.
सकाळी सात वाजेपासून शेतात गेलेला माणूस घरी परत येत नाही, असे म्हटल्यावर कुटुंबीयांनी शोधाशोध केली. शेतात गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीची चाबी दुचाकीलाच लावलेली होती. चप्पल दुचाकीजवळच काढली होती. शोधाशोध करताना नाल्यालगत असलेल्या त्यांच्या शेताच्या बांधावरील झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. (केसीएन)त्यानंतर नातेवाईकांनी प्रकाश पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. सुरेश पाटील यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी डॉ. सुरेश पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येची वार्ता कळताच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.