जामनेर (प्रतिनिधी) आयडीबीआय बँकेच्या एटीएम गॅस कटरचा वापर करून एटीएममधून सुमारे १३ लाखांची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम असून ते गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघकीला आला आहे. २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली . यावेळी पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय-३६) रा. जामनेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.