जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याविषयी सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एकूण १९ कोटी, ५५ लाख, १६ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन काही गावात पूर आला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यशासनाकडून मदत देण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. यात शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अश्या बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी १० हजार प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. यानुसार नाशिक विभागाला २२६ कोटी, ८९ लाख , १९ हजार रुपये एव्हढी रक्कम वितरित करण्यात येणार आहेत. यात जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत घरे क्षतिग्रस्त, मनुष्यहानी, जखमी असल्यास कपडे व घरगुती वस्तूंसाठी अर्थसहाय्य म्हणून २८ लाख, मृत जनावरांसाठी ८ लाख ३७ हजार, पूर्णतः नष्ट झालेली घरे, झोपड्या, गोठे यासाठी १० लाख, ६ हजार, शेत जमिनीच्या नुकसानीसाठी २८ लाख ६३ हजार, शेती पिके व बहूवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी यात एसडीआरएफच्या दराने १२ कोटी, ८१ लाख, ९८ हजार तर वाढीव दराने ५ कोटी, ९८ लाख, १२ हजार याप्रमाणे एकूण शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारी एकूण रक्कम १९ कोटी, ५५ लाख, १६ हजार अशी आहे. यात जिल्ह्यासाठी २६ कोटींची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर नुकसान झालेले आहे.








