फिर्यादीतून जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांचा मस्तवालपणा समोर
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात बुधवारी कालिका माता मंदिर चौकात रात्री डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात बालक ठार झाल्याच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादीतून वाळू माफियांचा मस्तवालपणा समोर आला आहे.
चेतन हरी बेंडाळे (वय ३१, रा. भादली ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दि. २५ डिसेंबर रोजी ते बहिण शितल व पाहुणे धीरज ब-हाटे यांचे अयोध्या नगर येथील घरी आले होते. संध्याकाळी भाचा योजस आणि भाची भक्ती यांना घेऊन ७ वाजेच्या सुमारास ते अयोध्या नगरातून कालिका माता मंदिर चौकात असलेल्या दुकानात चायनीज पदार्थ खाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ३५९३) ने निघाले होते.(केसीएन)त्यावेळेला कालिका माता मंदिर चौकात आले असताना भुसावळ कडून भरधाव वेगाने आलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या डंपरने चेतन बेंडाळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत त्यांचा भाचा योजस हा डंपरच्या पुढील चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाला तर भाची भक्ती आणि फिर्यादी चेतन बेंडाळे हे देखील जखमी झाले. यावेळी डंपरला कुठलाही रजिस्ट्रेशन नंबर नव्हता. (केसीएन)तसेच डंपरचालक याला फिर्यादीने जाब विचारला असता त्याने त्याचे नाव शुभम भोलाणे (रा. वांजोळा ता. भुसावळ) असे सांगितले. तसेच डंपर मालकाचे नाव आकाश बोरसे (रा. कांचन नगर, जळगाव) असे सांगितले. अपघाताबाबत मदत करण्याविषयी फिर्यादीने डंपर चालकाला सांगितले असता त्याने फिर्यादीला सांगितले की, डंपर चालवताना कोणालाही घाबरायचे नाही असे आम्हाला मालकाने सांगितले आहे असे उर्मट उत्तर दिले. तसेच ओळख पटू नये म्हणून रजिस्ट्रेशन नंबर डंपरला टाकलेला नाही असेही फिर्यादीला सांगितल्याचे नमूद आहे.
त्यानंतर अपघातग्रस्तांना कुठलीही मदत न करता चालक हा तेथून पळून गेला. त्यानंतर जखमी चेतन बेंडाळे यांनी नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली तर नागरिकांनी जखमी योजस व भक्ती यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योजस याला तपासून मयत घोषित केले. तर भक्ती हीच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फिर्यादीवरून अवैधरित्या रेती वाहून नेणारे डंपर चालक व मालक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.