जळगावात छ. शिवाजीनगर उड्डाणपुलावर घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये उड्डाणपुलावरून ट्रक रिव्हर्स आल्याने काही रिक्षा आणि दुचाकींचा चुराडा झाला होता. त्यात ४ ते ५ जण जखमी झाले होते. यातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुरेश रूपचंद जयस्वाल (वय ५१,रा. छत्रपती शिवाजीनगर परिसर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपासून ते घरीच होते.(केसीएन)शनिवारी दि. २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता सुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून जाणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना चिरडले. यात रिक्षांसह दुचाकी या पूर्णपणे दाबल्या गेल्या.
या घटनेत ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. यात सुरेश जयस्वाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.