जामनेर तालुक्यातील सामरोद येथील घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सामरोद रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. गेल्या नऊ दिवसापासून तरुण उपचारात मृत्युशी झुंज देत होता. मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी त्याची प्रकृती गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
निखील संदीप साळवे (वय १८, रा. वाडीकिल्ला) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील याचे वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला एक लहान सुमित नावाचा भाऊ असून आई, वडील, मामा असा त्याच्या पश्चात परिवार आहे. निखील साळवे हा शेतीचे काम करुन कुटुंबियांच्या कामाला हातभार लावत होता. तो सामरोद येथे त्याच्या मामांकडे आला होता. सोमवारी ८ डिसेंबर रोजी दुचाकीने सामरोद येथे जात होता. तळेगाव ते सामरोद रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रॅक्टरची दुचाकीला धडक झाली. या अपघातात निखील याच्या डोक्याला गंभीर मार लागुन जखमी झाला. त्याला तातडीने येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान आज दुपारी उपचारात त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला अधिकच्या उपचारासाठी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता कळाल्यानंतर कुटुंबियासह नातेवाईकांना जबर धक्का बसला. निखिल हा होतकरु तसेच हातमजूरीच्या कामाला जात होता. पोलीस पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.









