एरंडोल तालुक्यातील खडके गावाजवळील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : विवाह समारंभ आटोपून सासरवाडी येथे जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३८ वर्षीय युवक जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात कासोदा रस्त्यावरील खडके गावाजवळ झाला.
कुंडाणे (ता. जि. धुळे) येथील अनिल रघुनाथ पाटील हे मित्र अरुण काळू मराठे यांच्यासह दुचाकीने विवाह समारंभासाठी आले होते. दुपारी विवाह पार पडला. या नंतर दोघेही भडगाव तालुक्यातील बलवाडी येथे अनिल पाटील यांच्या सासरवाडी येथे जात होते. दरम्यान कासोदा रस्त्यावरील खडके गावाजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. दोघेही खाली पडल्याने ट्रकचे मागील चाक अरुण मराठे यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मित्राच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे जखमी झालेल्या अनिल पाटील यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्यामुळे शेतात काम करीत असलेले शेतकरी व शेतमजूर यांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांनाही खासगी वाहनाने रुग्णालयात आणले. अपघातात जखमी झालेल्या अनिल पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास देशमुख तपास करीत आहेत.