जामनेरात ‘आयशर’ ने कट मारल्याने इंडिका नाल्यात कोसळली
२ जागीच ठार ; ३ अत्यवस्थ, ६ महिन्यांचे बाळ वाचले
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनाने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात आणखी ३ जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे.
अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (वय २५, रा. तुकाराम नगर), सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) हे ठार झाले आहेत. तर हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत. स्पंदन याचे वडील पंकज यांचा अपघातात मृत्यू झाल्याने तो पितृप्रेमाला आता पोरका झाला आहे. तर त्याची आई हर्षा सैंदाणे ह्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भुसावळ येथील नागरिक पाचोराच्या दिशेने लग्नकार्याच्या निमित्ताने इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते. टाकळी गावाजवळ आल्यानंतर नागदेवता मंदिरापाशी अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने इंडिगो कारला जबर कट मारला. परिणामी, इंडिका चालकाचा ताबा सुटला आणि कार साईड पट्टीवरुन नाल्यात जाऊन कोसळली. यामुळे इंडिगो कार मधील महिला व पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण अत्यवस्थ झाले.
तसेच सहा महिन्यांचे बाळ या अपघातातून वाचले आहे. असुन त्यालाही जखमा असल्याने खाजगी हाँस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तर इतर जखमींना नागरिकांनी जामनेरच्या जी. एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन आणि नागरिकांनी भेट देऊन जखमींची विचारपूस करीत त्यांच्या मदतीसाठी धावपळ केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली असून घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आयशर वाहनधारक वाहनासहित फरार झालेला आहे. त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यात पॅजो रिक्षा – ट्रक यांच्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले असल्याची घटना घडली होती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच हा अपघात झाल्याने जामनेर सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.