रावेर तालुक्यातील पाल येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : भरधाव आयशर ट्रकने बैल घेऊन जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी व चार बैल ठार झाले. ही घटना तालुक्यातील पाल येथे पाल- रावेर रस्त्यावर घडली. याबाबत वाहन चालकाविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख फिरोज शेख गंभीर (रा. बहादरपूर, जि. बऱ्हाणपूर, ह. मु. पाल) हा शुक्रवारी दि. २७ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पालहून रावेर येथील शुक्रवारच्या बाजारात बैल विक्रीसाठी घेऊन येत असताना हबीब तडवी यांच्या पेट्रोलपंपासमोर भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच १९, झेड ५२८५) जोरदार धडक दिली. यात पादचारी शेख फिरोज शेख गंभीर (वय ३२) हा व चार बैल जागीच ठार झाले. याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक पिंटू (पूर्ण नाव माहित नाही) हा फरारी झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील तपास करीत आहेत.









