एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ एका हॉटेल समोर खाजगी ट्रॅव्हल्सने डिव्हायडरला धडक दिल्याने व चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचा चालक आणि क्लीनर यांचा मृत्यू झाला असून घटनेत सुमारे १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निमकथाना जिल्हा राजस्थान येथून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चौधरी यात्रा कंपनीची ट्रॅव्हल्स बस हि दोन् दिवसांपूर्वी निघालेली होती. शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बस एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथून जात असताना तेथे एका हॉटेल समोर बसने धडक दिली व भीषण अपघात झाला. यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.
या अपघातात चालक व क्लीनर यांचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तींपैकी एकाचे नाव मुकेश कुमार शंकरलाल गुर्जर (वय ४०, राजस्थान) असे असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम राजस्थान समाज बांधवांकडून सुरू होते. तर मुकेश छोटेलाल गुजर (वय ३५), बलराम किशोराम गुजर (वय ४०) दीपेंद्र कुमार सिंग (वय ४०), अशोक यादव (वय ३५) या चार जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आणखी सहा ते सात जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मयत दोघांचा मृतदेह शवविच्छेदन कक्षात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अपघाताची माहिती जाणून घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम नागरिकांच्या मदतीने सुरू झाले होती. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे.