पाचोरा शहरातील जळगाव चौफुली येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील जारगाव चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाले असून पतीसह दोन जण जखमी झाले आहेत. पाचोरा पोलीस स्टेशनला ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात बुधवार दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला आहे.
शेख इस्माईल अब्दुलनबी मणियार रा. गिरड ता. भडगाव हे त्यांची पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय – २६ वर्ष) यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पाचोऱ्यातील जारगाव चौफुली जवळ खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान, जारगाव चौफुली येथे रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली.
यात सना शेख इस्माईल मणियार ह्या ट्रकखाली आल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख इस्माईल मणियार यांचेसह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व ४ वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. त्यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काॅंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी आदींनी घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पाचोरा पोलीस स्टेशनला ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.