जळगाव शहरातील रामदास कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकीवरुन घराकडे जात तरुण अचानक समोर आलेल्या कारवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि. १३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत घडली. रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. रामानंदनगर पोलीस स्टेशनला घडण्याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.
निलेश केशव बारी (आबंटकर) वय ४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.(केसीएन) शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागरपार्ककडून घराकडे जात असतांना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून (एमएच १६, बीवाय ७५५५) क्रमांकाची कार यावेळी अचानक समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते कारवर आदळले. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार हे थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तासापर्यंत पडलेले होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.(केसीएन)याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषीत केले.
यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. दरम्यान, रामानंदनगर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अपघात झाल्यानंतर दुचाकी धडकलेल्या कारचालक रुग्णालयात दाखल झाले. त्या कारमधील नागरिक हे अहमदनगर येथील असून ते जळगावात आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी आले होते. त्याठिकाणी जात असतांना हा अपघात झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.