धुळे तालुक्यात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तांबापुरा भागातील तीन तरुणांचा धुळे येथे जात असताना फागणे गावाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातातील एक जण जागीच ठार झाला होता. तर दोघांवर उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी दि. २२ जून रोजी यातील एका तरुणाचा उपचार सुरू असताना जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे तांबापुरावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
अरबाज खाटीक (वय २२, रा. तांबापुरा,जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. हातमजुरी करून अरबाजचे वडील परिवाराचा उदरनिर्वाह करतात. बुधवार दि. १९ जून रोजी धुळे येथे एका कामानिमित्त तांबापुरातील जुनेद शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक हे तीन तरुण दुचाकीने निघाले होते.(केसीएन) दरम्यान, फागणे गावाजवळ आले असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून त्यांचा भीषण अपघात झाला होता.
या अपघातात जुनेद शेख याचा मृत्यू झाला होता तर अरबाज खाटीक याच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. तर तिसरा जखमी सलमान खान याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(केसीएन) दरम्यान उपचार सुरू असताना शासकीय रुग्णालयामध्ये अरबाज खाटीक याचा शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे तांबापुरावर पुन्हा एकदा शोककळा पसरली असून तरुणांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(केसीएन) सदर घटनेबद्दल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.