मृतांमध्ये नवरदेवाच्या थोरल्या भावासह चुलत बहिणीचा समावेश
जामनेर ( देविदास विसपुते ) – जामनेर तालुक्यातील पहूर मार्गावरील टाकळी गावाजवळ आज सकाळी इंडिका कारला समोरून धडक देणारा ट्रक घटनास्थळावरून फरार झाला आहे . या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा सैंदाणे यांचा जळगावातील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे . या अपघातातील मृतांची संख्या आता ३ झाली असून लग्नाला औरंगाबादकडे निघालेल्या नवरदेवाच्या थोरल्या भावासह चुलत बहिणीचा मृतांमध्ये समावेश आहे .
या दुर्घटनेमुळे भुसावळातील तुकारामनगरावर शोककळा पसरली आहे . राजन सैंदाणे यांची आज हळद होती उद्या औरंगाबादेत हा विवाह सोहळा संपन्न होणार होता . सैंदाणे कुटुंब भुसावळात तुकारामनगरात राहतात . या अपघातात मृत्युमुखी पडलेले पंकज गोविंदा सैंदाणे (वय २८, रा. तुकाराम नगर) हे नवरदेव राजन सैंदाणे यांचे थोरले बंधू होते . नवरदेवाची चुलत बहीण प्रतिभा जगदीश सैंदाणे जळगाव येथे उपचार चालू असताना मयत झाली . या अपघातात सुदैवाने वाचलेला पंकज सैंदाणे यांचा ९ महिन्यांचा मुलगा स्पंदन याला नातेवाईक तात्काळ भुसावळला घेऊन गेले आहेत . पंकज सैंदाणे हे कार चालवत होते . या अपघातात दगावलेल्या सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) ब्युटीपार्लर चालवत होत्या ,नवरदेवाकडील महिलांच्या मेकअप साठी त्या या कारमधून जात होत्या.
स्पंदांची आई हर्षा पंकज सैंदाणे व नेहा राजेश अग्रवाल यांच्यावर जामनेरातील जी. एम. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत . सैंदाणे कुटुंबाशी स्नेहाचे संबंध असलेल्या नेहा अग्रवाल याच कारमधून सोबत जात होत्या .
अपघाताची माहिती औरंगाबादेतील नवरीच्या कुटुंबाला दिल्यांनंतर अन्य वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसेस भुसावळकडे माघारी बोलावण्यात आल्या आहेत . जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला असून पुढील तपास पो उ नि अंबादास पाथरवट करीत आहेत .