जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील खिर्डी बु. चे सरपंच आणि जळगाव तालुक्यातील नंदगाव गृप ग्रामपंचायतीचे तीन सदस्यांनवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथील सरपंच किरण पितांबर कोळी (तावडे) यांनी निवडून आल्यापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. यासंदर्भात मधुकर प्रभाकर ठाकुर यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार जिल्हाधिकार्यांसमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणी अंती सरपंच किरण कोळी यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामपंचायत अधिनियम-१९५९ चे कलम ३०-१- अ नुसार सरपंच पदावरून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
नंदगावचे तीन सदस्य अपात्र
जळगाव तालुक्यातील गृप ग्रामपंचायत असलेल्या नंदगाव येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास पुरमल भिल, जिजाबाई शांताराम धनगर आणि कमलबाई
वासुदेव कोळी यांनी ग्रामपंचायतीचा कर नोटीस मिळाल्यापासून तीन महिन्यात भरणा न केल्याची तक्रार भूषण गुणवंतराव पवार यांनी सीईओंकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी होऊन कैलास भिल, कमलबाई कोळी आणि जिजाबाई धनगर या
तिघांचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आले आहे.