जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रावेर तालुक्यात कारवाई
जळगाव प्रतिनिधी : शेताची मोजणी केल्यानंतर खुणा दाखविण्याच्या मोबदल्यात भूकरमापकाने साडेपाच हजारांची लाच मागितली. परंतू शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पैशांच्या मोबदल्यात अधिकारी राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८, रा. रावेर, ता. जळगाव) याने लाच स्वरुपात चक्क हरभरे मागितले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुलकर्णी यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. याप्रकरणी निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील मस्कावद येथे तक्रारदार यांचे सामाईक शेत असून त्यांनी दि. ७ जानेवारी रोजी अर्ज करुन शासकीय फी भरली हाती. त्यानंतर भूमीअभिलेख कार्यालयातील करभूमापक अधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जावून जमिनिचे मोजमाप केले होते. तक्रारदाराला मोजमापच्या खुणा दाखविण्यासाठी कुलकर्णी यांनी साडेपाच हजारांची लाच मागितली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर भूकरमापक यांनी शेतातील हरभरे दे असे सांगितले होते. परंतू तक्रारदाराला हरभरा देण्याची देखील ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतीच्या मोजमाप केलेल्या कामाचे खुणा दर्शवून सीमा निश्चिती करण्यासाठी तडजोडीनंतर चार हजारांची मागणी केली. पडताळणीत पैशांच्या मोबदल्यात हरभऱ्याची मागणी केली होती.
तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर भूकरमापक कुलकर्णी यांनी तक्रारदाराला निंभोरा येथे एका शेताजवळ बोलवून त्यांच्याकडून चार हजारांची लाच घेतांना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे