जळगावातील शासकीय कार्यालयाच्या आवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच कार्यालयाच्या आवारात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळीत अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्राहक मंच कार्यालयाच्या आवारात असलेल्या इलेक्ट्रीक डीपजवळ बुधवारी १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयास्पदरित्या एका अनोळखी तरूणाचा जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.
रूग्णवाहिकेतून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. मयताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.