जिल्हा कृषी विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभागाने पथकांची नेमणूक करत कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबवित आहे. या तपासणी मोहिमेत कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
मान्सून सुरु होण्यापूर्वी कृषी केंद्रांमध्ये बियाणे, खते विक्रीला सुरवात करण्यात येत असते. शेतकरी वर्ग देखील शेती तयार करत पेरणीच्या कामाला लागण्याच्या तयारीत आहे. बियाणे खरेदी करण्यास देखील जणांनी सुरवात केली आहे. मात्र बऱ्याचदा बनावट बियाणे, खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दरम्यान विविध कारणास्तव कृषी विभागाने ७ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत विविध कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.