विविध परिसंवादातून कार्यकर्त्यांना वक्त्यांचे अनमोल मार्गदर्शन
पुणे (प्रतिनिधी) :- सत्य जाणीवपूर्वक झाकून टाकण्याच्या काळात सत्याग्रहाच्या मार्गानेच समाज परिवर्तन होऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करण्याचा संकल्प करावा असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी व कामगार नेते बाबा आढाव यांनी केला.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था आयोजित ३५ वर्षपूर्ती निमित्त राज्य अधिवेशनाचे पुण्यातील संतभूमी आळंदी येथे उत्साहात उद्घाटन झाले. त्यावेळेला उद्घाटक म्हणून बाबा आढाव हे बोलत होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे,ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आरगडे, डॉ. प्रदिप जोशी, प्रधान सचिव ठकसेन गोराणे, संजय बनसोडे,गजेंद्र सुरकार,प्रा. परेश शहा, संपादक उत्तम जोगदंड यांच्यासह अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सरचिटणीस आदी उपस्थित होते.
मानवी मेंदूवर संतांच्या शिकवणुकीचे उपदेश रुजवण्याचा संकल्पाची कृती म्हणून संतांची वचने उद्घोषित करून मान्यवरांच्या हस्ते व्यक्तीच्या रिकाम्या डोक्याच्या प्रतिकृतीत ती वचने टाकून या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
बाबा आढाव पुढे म्हणाले की, आपण सारे एकच संविधान परिवारातील आहोत.सत्याग्रहात मोठी ताकद असून सत्याग्रह झाले पाहिजे व त्यात संविधान, लोकशाही मानणाऱ्या संस्था,संघटना व लोक चळवळी यांना आग्रहाने सहभागी करून घ्यावे असे सांगून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म प्रार्थना म्हटली.
ज्येष्ठ साथी बाबा आरगडे यांनी संघटनेच्या ३५ वर्षपूर्तीनिमित्त समितीने केलेल्या संघर्षाचा उल्लेख करून गेल्या ३५ वर्षात केलेल्या विविध कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय मनोगतात कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी ३५ वर्षातील संघटनेच्या साथींच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सुशीला मुंडे यांनी महाराष्ट्र अनिसच्या ३५ वर्षातील कृतीशील वाटचालीचे सर्व उपक्रमाबद्दल सविस्तर विवेचन केले. सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले तर आभार अतुल सवाखंडे यांनी मानले.
परिसंवादातून वैचारिक मेजवानी
राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘मन: स्वास्थ्य ते समाज स्वास्थ्य’ या विषयावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ प्रदीप जोशी,डॉ. अनिल डोंगरे यांनी कार्यकर्त्याची वैयक्तिक मन: स्वास्थ्य व समाजात मानसिक उपचारांबाबत असणारे गैरसमज आणि सद्य:स्थिती उपचारांबाबतची जनजागृती यावर भाष्य केले.डॉ प्रदीप पाटकर यांनी परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात समाजात आजही विषमता,सांस्कृतिक दहशतवाद,हिंसा या आव्हानांच्या विरोधात आपल्याला लढावे लागेल,नव्या अंधश्रद्धा निर्माण होत असून आपले काम संपत नसल्याचे सांगितले. सूत्रसंचालन काशिलिंग गावंडे यांनी तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मानले.
‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजची आव्हाने’ या दुसऱ्या परिसंवादात उत्तम जोगदंड, प्राचार्य डॉ. नितिन शिंदे, प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी फलज्योतिष, सुडो सायन्स, वास्तुशास्त्र, तंत्रज्ञानाच्या वापराने निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा याबद्दल वैचारिक मांडणी केली.डॉ.पंडित विद्यासागर यांनी जगाकडे पाहण्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आपण विकसित केला पाहिजे आणि ते आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे परिसंवादाच्या समोर प्रसंगी सांगितले.
फोटो कॅपशन : आळंदी (जि.पुणे) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्ष पूर्ती राज्य अधिवेशनाचे उद्घाटन करताना ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, सोबत अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील,कार्याध्यक्ष माधव बावगे,ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आरगडे,राज्य उपाध्यक्ष डॉ प्रदिप जोशी, प्रधान सचिव ठकसेन गोराणे, संजय बनसोडे,गजेंद्र सुरकार,प्रा. परेश शहा,संपादक उत्तम जोगदंड,आदी…