गृहमंत्री देशमुख यांची माहिती ; कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

रावेर / जळगाव (प्रतिनिधी) – रावेर शहरालगत असलेल्या बोरखेडा रस्त्यावर शुक्रवारी चार बालकांची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करत आरोपी गजाआड केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय दखल घेण्यात आली असून घटनास्थळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी भेट देऊन कुटूंबीयांचे सांत्वन केले. घटना निर्दयी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर केस जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून अँड. उज्वल निकम यांची विशेष नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. जळगाव पोलीसांनी चांगली कामगिरी केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

चारही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले होते. सकाळी शवविच्छेदन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रावेर येथे आणण्यात आले. मृतदेह आल्यावर कुटूंबीयांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. जुन्या तामसवाडी रोडवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपींना शिक्षा होण्यासाठी संतप्त समाजमनातून प्रतिक्रिया उमटत आहे. मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. प्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. प्रविण मुंढे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, आमदार शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, आ. अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, रमेश पाटील, सोपान पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्य्क पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, प्रातांधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, अॅड.रविंद्र पाटील, अभिषेक पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहे काही संशियतांना ताब्यात ही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पिडीतांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.









