राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. अनिल देशमुख यांची जळगावात माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांना किती जागा मिळाल्या हा निकष दुय्यम आहे. निवडणुकीत निवडून येणे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी लोकसभा लढली. त्यामध्ये चांगले समन्वय साधल्याने आम्हाला चांगले यश आले आहे. आमच्याकडे मोठा भाऊ-छोटा भाऊ असे काहीच नाही. महाआघाडीच्या कोअर कमिटीमध्ये प्रत्येक मतदार संघाची चर्चा करून कोण विजयी होईल त्याचा निकष म्हणून त्यांना तिकीट वाटप केले जाते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आ. अनिल देशमुख यांनी दिली.
आ. अनिल देशमुख हे रविवार दि.७ रोजी पक्षाच्या बैठकीसाठी जळगाव येथे आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. लोकसभेमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व स्वतः वेगवेगळे लढणार असून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस जरी म्हणत असले की,आम्ही स्वयंशक्तीने लढणार आहोत. कारण प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपापल्या मतदारसंघात किंवा इतर मतदारसंघात आपल्या ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी काम करीत असतो.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एंट्रीसाठी रांगा लागल्या आहेत. मात्र तो निर्णय शरद पवार घेतील. महायुती पक्षात तर आता स्वबळावर लढण्याच्या सांगण्यात आलेले असून निवडणूक झाल्यावर पुन्हा एकत्र येऊ असे अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.