भडगांव बालविकास प्रकल्प विभागाला दिले निवेदन
भडगांव (प्रतिनिधी) :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा देण्यात येऊन, अंगणवाडी सेविकांना- तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी लागु करण्यात यावी या सहज विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच भडगाव येथील बालविकास प्रकल्प विभागाला देण्यात आले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा, दरमहा पेंशन योजना सुरू करा, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रुपांतरण मोठ्या अंगणवाडी केंद्रात करावी, १०वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल ताबडतोब द्या, अंगणवाडी सेविकांमधुन पर्यवेक्षिकाची भरती वयाची अट न ठेवता करण्यात यावी . प्रोत्साहन भत्ता देण्यांत याव, ‘ इ.स. २०२३ ची भाऊबीज व गणवेश दिवाळी अगोदर देण्यांत यावी या व इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत दि. ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
अंगणवाडी सेविकांनी नोव्हेंबर महिन्याचे मासिक अहवाल देऊ नये. अशा आशयाचे निवेदन संघटक सचिव भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पदाधिकारी उज्वला बागुल,संगीता जडे यांनी बालविकास प्रकल्पांचे लिपिक संजय खामकर व अमोल भंडारे यांना दिले.
४ डिसेंबर पासून अंगणवाडी केंद्र बंद राहतील,अंगणवाडी सेविकांनी कोणतिही माहिती प्रकल्प कार्यालयाला देऊ नये. प्रकल्प कार्यालयाच्या दडपणाखाली बळी पडू नये. असे अध्यक्ष -एम ए पाटील सरचिटणीस – बृजपाल सिंह कार्याध्यक्ष – सूर्यमणी गायकवाड उपाध्यक्ष रश्मी म्हात्रे, निलेश दातखीळे आणि संघटक- सचिव – राजेश सिंह,भगवान दवणे , सतीश चौधरी, विष्णू आंब्रे, मुकुंद कदम जळगांव भानुदास पाटील, सुषमा चव्हाण जिल्हाध्यक्षा यांनी लेखी निवेदनाद्वारे तसेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.