जळगाव तालुका पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाळू उपसा सुरु असून सोमवारी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी फुपनगरी, आमोदा व सावखेडा या शिवारांमध्ये अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. यात तिघांना अटक करण्यात आले असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता फुपनगरी गावाकडून जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत (एम.एच.१९, सी.जे.१६७४) वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा केले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अजय भाईदास भिल (वय २१,रा.असोदा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत आमोदा शिवारात तापी नदी पात्रातून वाळू उपसा करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा करण्यात आले. या प्रकरणी बळवंत गोरख बाविस्कर (वय २५, पुनगाव, ता.चोपडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर तिसऱ्या घटनेत सावखेडा शिवारात गिरणा पंपीगजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजता विनाक्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा केले. शाम राजेंद्र पाटील (वय ३४) या ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुका पोलिसांनी या तिन्ही कारवाईतून एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.