भुसावळ शहरातील छकुलीसाठीच्या संवेदना कायद्यापुढे हतबल
जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या समोर अज्ञात महिलेने सहा दिवसाचे बेवारस बाळ सोडून दिल्याची घटना गुरुवारी दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. काही दिवस तेथील भिक्षुक परिवाराने सांभाळ केल्यावर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हे स्त्री जातीचे बाळ ताब्यात घेऊन जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुपारी ३.३० वाजता उपचारार्थ दाखल केले आहे.
भुसावळ बाजारपेठ स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल एस.एम.बारी, प्रणय पवार, मीना कोळी यांनी सदरहू बाळाला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेत जळगावला आणले. तेथे बालसुधारगृह मध्ये नोंद केल्यानंतर बाळाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे स्त्री जातीचे बाळ नवजात शिशू अतिदक्षता विभाग येथे उपचार घेत आहे.
बाळाची प्रकृती प्राथमिक दृष्ट्या ठणठणीत असून बाळाचा ताबा घेण्यासाठी बाजारपेठ पोलिस स्टेशनला अनेकांनी गर्दी केली होती. मात्र कायदेशीर कार्यवाही महत्वाची असल्याने पोलिसांनी त्याला उपचारार्थ जळगावला हलविले.
या स्त्री जातीच्या अर्भकाला पोलीस स्टेशनसमोरील काही भिक्षुक परिवाराने तीन ते चार दिवसांपासून सांभाळले होते. मात्र याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी तातडीने बाळाला ताब्यात घेत पुढील कार्यवाही केली. दरम्यान, गुरुवारी बाळाचा ताबा घेण्यासाठी अनेकांनी पोलीसांकडे विनवणी केली. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पोलिसांना देणे शक्य झाले नाही. यावेळेला बाळ सांभाळणाऱ्या महिलेला भावना अनावर झाल्या होत्या. या बाळाच्या मातेचा शोध पोलीस घेत आहेत.