माझी उमेदवारी विकासकामांसाठी असल्याची प्रतिक्रिया
पारोळा (प्रतिनिधी) :- माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. मंगळवारी दि. २९ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. वडील आ. चिमणराव पाटील यांचा जनसेवेचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी दिली आहे.
अमोल पाटील हे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन असून कृषी उत्पन्न बाजार समितीला गेली १५ वर्षे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अमोल पाटील मंगळवारी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय या पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. प्रसंगी नामांकन रॅलीकरीता मोठी गर्दी उसळणार असून महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत “केसरीराज”शी बोलताना उमेदवार अमोल पाटील म्हणाले की, गेली पंचवार्षिक काळात वडील आ. चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विकास कामे केली. यामुळे जनतेने त्यांना लोकप्रिय केले. या विकासकामांमुळे व कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाने मतदारसंघात विकासाची गंगा आली आहे. वडिलांचा हाच समाजकारणाचा वसा पुढे नेण्याचे काम मी करणार आहे. त्यासाठी जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही आवाहन अमोल पाटील यांनी केले आहे.