चोपडा रस्त्यावर सापळा रचून शिरपूरच्या तरुणाला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) : येथे गांजा विक्रीला आणणाऱ्या शिरपूर येथील एकाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळून गांजा व रिक्षासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव एलसीबीसह अमळनेर पोलीस यांनी दिनांक १४ रोजी रात्री साडे नऊ वाजता संयुक्त कारवाई करून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पिवळ्या रंगांच्या रिक्षा क्रमांक (एम एच १८, एजे ३७९२) मधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळताच त्यांनी पारोळ्याचे तथा अमळनेरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सांगितली. पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एलसीबी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, रवींद्र पाटील, दीपक माळी, यांच्यासह जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन, अमोल पाटील, विनोद संदानशीव यांना छापा टाकण्यासाठी पाठवले.
सर्व पथकाने चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्या बाजूला रस्त्यावर सापळा लावून ठेवला. रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी चोपड्याकडून पिवळ्या रंगाची ती रिक्षा येताना दिसली. रिक्षा चालकाने त्याचे नाव कोमलसिंग विकास राजपुत (वय २९, रा. भोरखेडा ता. शिरपूर) असे सांगितले. त्याच्याजवळील रिक्षामध्ये गोणीत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ किलो ३२८ ग्राम गांजा आढळून आला. कोमलसिंग याला गांजा आणि १ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालसह अटक करण्यात आली. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.