अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी):- येथील रुपजीनगर भागात एका ३२ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून, पत्नीसह तिघांनी अपमानित करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुनील श्रावण भोई (वय ३२, रा. रुपजीनगर, अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास टाकरखेडा ते अमळनेर दरम्यान असलेल्या ‘अप’ रेल्वे लाईनवर सुनील यांनी रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मृत सुनील यांचा भाऊ सागर श्रावण भोई (वय २७) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, २९ जानेवारीच्या रात्री ३:०० वाजेच्या सुमारास सुनील यांच्या घराच्या मागील खोलीत त्यांची पत्नी दिपाली आणि अजय छोटू भोई हे दोघे आक्षेपार्ह अवस्थेत मिळून आले.
या प्रकारानंतर सुनील यांनी विचारणा केली असता, पत्नी दिपाली, अजय छोटू भोई आणि सुरेखा छोटू भोई या तिघांनी सुनील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तुला जगण्याचा अधिकार नाही, तू मरून जा अशा शब्दांत त्यांचा अपमान करून त्यांना मानसिक त्रास दिला. याच जाचाला कंटाळून सुनील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे









