साळीवाडा भागात ७ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी): येथील साळीवाडा भागातील नथूभाऊ बारी यांच्या घराजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला ७ संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुभम दिलीप वाणी (वय २७, रा. साळीवाडा) आणि आरोपी केसर आबिद सय्यद यांच्यात ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून किरकोळ वाद झाला होता. तो वाद त्यावेळी मिटला होता, मात्र आरोपींच्या मनात त्याचा राग होता. ९ जानेवारी २०२६ च्या रात्री शुभम आपल्या मित्रासोबत हॉटेल पाटीलवाडा येथे जेवण करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी शुभमचा मोबाईल नेऊन पुन्हा परत केला. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास आरोपी केसरने शुभमला फोन करून घराबाहेर बोलावले.
शुभम घराबाहेर आला असता, आरोपी केसर सय्यद, झाकीर पठाण, नावेद शेख, समीर शेख, इम्रान शेख, नासिर शेख आणि साहिल शेख (सर्व रा. अमळनेर) हे हत्यारांसह तिथे दबा धरून बसले होते. आरोपींनी शुभमला शिवीगाळ करत “आज तेरा खेल खल्लास करते है” असे म्हणून डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. शुभम जमिनीवर पडलेला असताना त्याला लाथाबुक्क्यांनी आणि रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.
या गोंधळात आरोपींनी शुभमच्या गळ्यातील सोन्याची चेन, खिशातील ६,५०० रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून घेतला. तसेच परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली. गल्लीतील लोक जागे झाल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.









