आधार सामाजिक संस्थेकडे आली होती माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील आधार सामाजिक संस्थेकडे अमळनेर शहरात बालविवाह होत असल्याची माहिती आली होती. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी नितीन मुंडनवरे यांना माहिती देताच त्यांनी होणारे लग्न थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार हा बालविवाह रोखण्यात यश आले.
अमळनेर शहरात मंगळवारी बालविवाह होत असल्याची तक्रार आधार संस्थेकडे आली होती. त्यानुसार संस्थेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे व निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके यांना हा बालविवाह रोखण्याबाबत आदेश दिल्यानंतर घटनास्थळी नायब तहसीलदार धमके, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला संरक्षण अधिकारी व आधार प्रतिनिधी हे घटनास्थळी गेले. त्यांनी तातडीने चौकशी करून विवाह थांबवला.
मंगळवारी अमळनेरात अल्पवयीन विवाह होत असल्याची खबर अज्ञाताने कळविली होती. त्याबाबतची खात्री झाली व वयाबाबत मुलीचे आधार कार्ड झेरॉक्स घेऊन चौकशी केली असता ती अल्पवयीन आढळल्याने हा विवाह थांबवण्यात आला. या मुलीचे वय कमी असल्याने पुढील तपास व संबंधितांचे जाब जबाब नोंदवण्याचे काम पोलिस स्टेशन अमळनेर येथे सायंकाळी सुरू होते. चौकशीअंती लेखी नोंदवून संबंधितांना समज देण्यात आली.