अमळनेर पोलिसांनी केली कारवाई, दोन वर्षांपासून होता फरार
अमळनेर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील साखर कारखान्यासाठी ऊसतोड मजुरीचे पैसे घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी धोंडू पंडित भिल याला पोलिसांनी चोपडा येथील कारगिल चौकातून अटक केली आहे.
अंबर हिरामण भिल (रा. साळवे, ता. शिंदखेडा) या ठेकेदाराला इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्यासाठी ऊसतोड मजुरांची आवश्यकता होती. दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी ते तालुक्यातील जानवे येथे गेले. तेथे धोंडू पंडित भिल याच्या माध्यमातून काहीजणांशी संपर्क झाला. त्यांना १४ जणांचे साडेपाच लाख रुपये आगाऊ दिले. त्याचा करारनामा झाला. मात्र अंबर भिल जेव्हा मजुरांना घ्यायला गेले, त्यावेळी त्यांनी नकार दिला आणि पैसेही परत दिले नाहीत.
या प्रकरणी १४ जणांविरोधात अमळनेरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात १० संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मुख्य संशयित आरोपी धोंडू भिल हा पोलिसांना चकवा देत होता. अखेर त्याला चोपडा येथील कारगिल चौकातून अटक केली. आरोपीला अटक करताच इतर मजुरांनी पोलिसांचे वाहन रोखून संशयित आरोपीला वाहनातून उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेगाने गाडी पळवून संशयित आरोपीला अमळनेर पोलिस स्टेशनला आणले. अमळनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपीची चौकशी करण्यात आली आहे.