गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी) : स्मारकाजवळ झोपत जाऊ नको असे सांगण्याचा राग आल्याने एका तरुणाने भोई समाज मढीच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना दिनांक दि. ३० रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.
विशाल दशरथ चौधरी (रा.भोईवाडा) हा भोई समाज पंचमंडळ मढी जवळ असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकावर दि. ३० रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट पॅन्ट वर झोपला होता. तेथून महिला येत जात असल्याने नागरिकांनी त्याला शॉर्ट पॅन्टवर झोपू नको म्हणून सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने बाजूला असलेल्या मोटरसायकलमधील पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत काढून ते मढीच्या दरवाजाच्या लाकडी पाट्यांवर टाकून पेटवून दिले. तेथील उपस्थितांनी आग विझवली.
दीपक शांताराम भोई याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विशाल चौधरीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३२६ जी , ३५२ ,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या पथकाने आरोपी विशाल याला अटक केली असून न्यायालयाने संशयित आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गेल्या वर्षी एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.