दोन्ही घटनेतील मुद्देमालासह संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरांमध्ये सराफ व्यापाराचे दुकान फोडून त्यातील चांदी लांबवल्यानंतर हिम्मत वाढली त्यानंतर थेट जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या फुले मार्केट येथून तीन दुकाने फोडत मुद्देमाल लांबवण्याची करामत दोन अल्पवयीन चोरट्यांनी केले आहे शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर पोलीस ठाण्यासमोरील फुले मार्केट मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात कपड्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून कपड्यांसह रोकड लांबवून नेली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, ही चोरी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने केल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तेजस मराठे यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले. तेथे तीन दुकाने फोडून चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तांबापुरा परिसरात राहणाऱ्या साथीदारासह अन्य दोन जणांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तांबापुरा परिसरातून दुसऱ्या अल्पवयीन चोरट्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघ अल्पवयीन चोरट्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी मालेगावातील किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफाच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. याठिकाणाहून चौघांनी १२ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेले होते.
त्या अल्पवयीन चोरट्यांनी त्यातील साडेसहा किलो चांदीचे दागिने काढून दिले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश पाटील, सुधीर साळवे, अमोल ठाकूर, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.