यावल तालुक्यात घडली होती घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयिताला भुसावळ सत्र न्यायालयाने २० वर्ष शिक्षा सुनावली. या खटल्यात पीडीता, तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (२०, यावल तालुका) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. यावल तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या आठ वर्षीय पिडीतेला केळी खाण्यासाठी संशयित आरोपीने आमिष दाखवले. आरोपी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (२०, यावल तालुका) याने अत्याचार केला होता. ही घटना ८ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी यावल पोलिसात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज भुसावळातील विशेष न्यायालयात चालले.
सरकार पक्षातर्फे या खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पीडीत बालिका, वैद्यकीय अधिकारी डॉ.जया शिंदे, डॉ.कमलाकर रेड्डी, डॉ.बाबूलाल बारेला, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. आरोपीला विविध कलमान्वये एकूण २० वर्ष शिक्षा व दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक भीमदास हिरे तर केस वॉच म्हणून कॉन्स्टेबल अनिल पाटील व एजाज गवळी यांनी काम पाहिले.