उत्तरप्रदेशात अयोध्या येथे घडली होती घटना
बोदवड (प्रतिनिधी) :- सोशल मीडियाच्या ओळखीतून घडलेल्या घटनेत उत्तर प्रदेश येथील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे. या घटनेबाबत अधिक चौकशीकरिता उत्तर प्रदेशाचे पोलीस पथक थेट बोदवड शहरात दाखल झाले होते. या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणांत दोन दिवस सखोल चौकशी केली. या चौकशीअंतर्गंत बोदवड येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस पथक उत्तर प्रदेशात गेले.
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील जन्मभूमी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलींचे वय १६ ते १७ वर्षदरम्यान होते. मुलीने आत्महत्या का केली ? याबाबत उत्तर प्रदेशातील पोलीस चौकशी करीत होते. त्यातच या तरुणीची सोशल मीडियावर महाराष्ट्रातील बोदवड येथील तरुणासोबत ऑनलाईन मैत्री झाली. तिने या प्रकरणातच आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणीच्या मोबाइलची हिस्ट्री तपासली असता उत्तर प्रदेश पोलिसांना बोदवड येथील संपर्क क्रमांक आढळून आला. या नम्बरवरुन माग काढत अयोध्या येथील पोलिस बोदवड शहरात दाखल झाले होते. त्यांनी याप्रकरणी बोदवड शहरातील कुरेशी वाड्यात राहणारा विवाहित समीर कुरेशी या तरुणाची चौकशी केली. त्याची गुरुवारी दि. २६ जून रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर अयोध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी अयोध्या येथे सोबत घेऊन गेले आहे.