जळगाव शहरातील रजा कॉलनी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – घरी एकटीच असलेल्या १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दि. १० जून रोजी दुपारी रजा कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुमेरा रहीम पटेल (१५, रा. रजा कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. मजुरी काम करणारे तिचे वडील रहीम पटेल हे कामावर गेलेले होते व त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तर मुलगा घराबाहेर खेळत होता. घरात एकटीच असलेल्या हुमेरा हिने गळफास घेतला. भाऊ घरात गेला त्या वेळी त्याला बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने गर्दी केली होती. कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.