भुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील एका महिलेला अल्पवयीन मुलीसह भुसावळ रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हि महिला अल्पवयीन मुलीस गैरइराद्यानें मुंबई येथे घेऊन जात असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यानुसार कुशीनगर रेल्वेच्या डब्यात हि कारवाई करण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे पोलिसांना शुक्रवारी २१ रोजी गोपनीय संदेश मिळाला होता. त्यानुसार त्यांनी कुशीनगर एक्स्प्रेस येथे बी १ या डब्यात संध्याकाळी सव्वा पाच वाजता रेल्वे आल्यावर तपासणी केली. तेथे शबाना (वय २२, रा. पकरी, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) हि महिला एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसह संशयास्पद स्थितीत दिसून आली. तिकीट तपासनीस रकमराज मीणा यांना तिकीट तपासताना दोघांवर संशय आला होता. त्यानुसार चौकशी करण्यात आली. चौकशीत सदर महिलेने समाधानकारक उत्तरे दिली नाही.
सदर महिला व मुलीला घेऊन जीआरपीएफ स्टेशन, भुसावळ येथे नेण्यात आले. तेथे महिलेला पोलिसी खाक्या दाखविताच, तिने सदर मुलगी हि उत्तर प्रदेशातील बस्ती येथील स्टेशनवर दिसली. तिला फूस लावून गैरइरादा ठेवत सोबत घेऊन मुंबईला नेत असल्याचे सांगितले. तसेच, सदर अल्पवयीन मुलीनेही, सोबतच्या महिलेला मी ओळखत नाही असे सांगितले. या मुलीकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. यानंतर जीआरपीएफ पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगर करीत आहेत.
सदर कारवाई हि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेम चौधरी, आरक्षक अली शेर, आरक्षण जे पी मीणा, जीआरपी स्टाफ सुधीर पाटील तथा समतोल प्रकल्प महिला कर्मचारी प्रतिभा महाजन, आरक्षक उमेश तिवारी यांनी केली आहे.