प्रभाग १९ ‘क’ मध्ये अलका सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचाराचा धडाका
जळगाव(प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग १९ ‘क’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी प्रभागातील विविध नगरांमध्ये निघालेल्या रॅलीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.

शुक्रवारी सकाळी ही रॅली महाजन नगर येथून सुरू झाली. त्यानंतर एकनाथ नगर, रेणुका नगर, सप्तशृंगी कॉलनी, हनुमान नगर आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय परिसरातून मार्गक्रमण करत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विशाल देशमुख यांच्या त्या मातोश्री असल्याने, देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा फायदा आणि जनसंपर्क या रॅलीत प्रकर्षाने दिसून आला.
या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात पक्षाचे झेंडे आणि विकासाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी महिलांनी अलका सपकाळ (देशमुख) यांचे औक्षण करून स्वागत केले, तर ज्येष्ठांनी त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले.
“प्रभागातील मूलभूत सुविधा, महिलांचे प्रश्न आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशाल देशमुख यांनी ज्या पद्धतीने समाजसेवा केली आहे, त्याच वारशाने मी प्रभागाचा कायापालट करेन,” असा विश्वास उमेदवार अलका सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.









