पोहरागड येथे आयोजन केल्याची बंजारा बिग्रेडचे ज्ञानेश्वर राठोड यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरागड येथे दि. ५ एप्रिल रविवार रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या व बंजारा समाजातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे खानदेश विभागीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांनी केले आहे.

अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत रमेश महाराज, महंत शेखर महाराज, महंत यशवंत महाराज, महंत खुशाल महाराज, प्रकाश महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या प्रमुख बंजारा नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याला बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड हे मार्गदर्शन करणार आहे. मागील अनेक वर्षापासून देशपातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
भारतातील १५ कोटी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागड येथे अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी महाराष्ट्रासह १३ ते १४ राज्यातील बंजारा बांधवांची उपस्थिती राहणार आहे. अभूतपूर्व ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने या जनजागृती मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा ब्रिगेडचे खानदेश विभागीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांच्यावतीने करण्यात आले आहे.









