अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी)- राज्यातील अकृषी विद्यापीठामधील अशासकीय कर्मचारी संघटनांच्या होत असलेल्या संपावर त्वरीत तोडगा काढावा,त्याचा विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम होऊ शकतो, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयीन-विद्यापिठांच्या परिक्षांचे सत्र सुरू आहे. ऐन परिक्षा कालखंडात आलेल्या कोरोनाच्या व त्यानंतरचे लॉकडाऊन यामुळे परिक्षा होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतू विद्यार्थ्यांचे हित बघत अंतिम परिक्षा होणे आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या परिक्षा राज्यात सुरू आहे. परंतू आपल्या विविध मागण्यांना घेवून महाविद्यालय आणि विद्यापीठ अशासकीय कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परिक्षांवर परिणाम होवून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अशासकीय कर्मचारी संघटनांच्या विविध रास्त मागण्यांसाठी शिक्षण मंत्र्यांनी त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अभिविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, विदर्भ प्रदेश मंत्री रवी दांडगे, कोकण मंत्री प्रेरणा पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .