कोणत्या माजी मंत्र्याने म्हटले ?
पुणे (प्रतिनिधी) : – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. याच दरम्यान, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले ढोबळे यांनी अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ढोबळे लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दि. १७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. तसेच अवघ्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी देखील केली होती. कारण भाजप पक्षामध्ये मागील १० वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे केली होती. लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनचं मी राष्ट्रवादी सोडून भाजप पक्षामध्ये गेलो होतो. मात्र आता ते भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देखील देऊ लागले आहेत.परंतु आता अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता मी पुन्हा भाजप सोडत आहे असे म्हणत लक्ष्मण ढोबळे यांनी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केली आहे.